Pages

Sunday, August 7, 2011

तीन खोल्यांमध्ये पाच वर्ग भरतात

नळदुर्ग (शिवाजी नाईक) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा म्हणजे ‘गोंधळात गोंधळ’ असे असून उर्दू माध्यमचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे पाच वर्ग तीन खोल्यामध्ये भरविण्यात येत आहे.तर अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई करावी. शिक्षण खात्याच्या या भोंगळ कारभाराबद्दल पालकांतुन असंतोष खदखदत आहे.
चालू शैक्षणिक वर्ष सुरू होवून
दोन महिने उलटत आले असून उर्दू माध्यमचे १ ली ते ५ वी पर्यंतचे वर्ग सध्या तीन अपुर्‍या खोल्यांमध्ये दाटीवाटीने भरविण्यात येत आहे. अपुरे वर्ग, शिक्षकांची संख्या तोकडी, शैक्षणिक साहित्य म्हणावे तसे उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे, यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. अद्यापपर्यंत शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना एकही पुस्तक दिले नाही. नळदुर्ग येथील गैरसोयीने परिपूर्ण असलेली जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमचे २४८ विद्यार्थी, उर्दू माध्यमचे ९६ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवी असे मिळून ७० च्या जवळपास विद्यार्थ्यांना जि.प. शिक्षण खात्याने अद्यापपर्यंत पुस्तकेच दिली नाही. त्यामुळे दस्तुरखुद्द गुरूजी विद्यार्थ्यांना काय शिकवावे, असा सवाल करून विद्यार्थ्यांचे जाणुनबुजून शैक्षणिक नुकसान करणार्‍या मस्तवाल जि.प. खात्याच्या संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुख्याध्यापक अखलाक ए.एम. यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालय तुळजापूर यासह इतर संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना शाळा सुरू झाल्यापासुन इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्गाच्या शालेय साहित्यासह पुस्तकांची वारंवार मागणी करूनसुद्धा आजतागायत पुस्तके देण्यात आली नाहीत. उलट गटशिक्षण अधिकार्‍यांनी पुस्तके शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून व नवीन पुस्तके मिळणार नाहीत, असे संागुन आपल्या कर्तव्याच्या प्रती किती जागरूक असल्याचे त्यांच्या या कारभारावरून दिसून येते. दरम्यान, उर्दू शाळेला तात्काळ पुस्तके वाटप करण्याची मागणी पालकांतुन करण्यात येत आहे. अन्यथा शिक्षण खात्याच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र इशारा छेडण्याचा इशारा दिला जात आहे.

No comments:

Post a Comment