Pages

Sunday, August 7, 2011

पावसाअभावी नळदुर्ग किल्ल्यातील ‘नर मादी’ धबधबा बंद; पर्यटकांची निराशा

मराठवाड्यातील नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) शहरातील इतिहासप्रसिध्द किल्ल्यातील व स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणारा ‘नर मादी’ हा धबधबा यंदाच्या वर्षी नळदुर्गच्या बोरीधरण पाणलोट क्षेत्रात म्हणावे तशी पर्जन्यवृष्टी न झाल्याने अद्यापपर्यंत चालू झाले नाही. त्यामुळे खूप दुरवरून येणार्‍या पर्यंटकांची घोर निराशा होत आहे.
मराठवाडयात तब्बल तिन वर्षानंतर पावसाने गेल्यावर्षी सरासरी ओलांडली होती. सर्वत्र ओढे, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत होते. परिसरातील सर्वात मोठे असलेले बोरी धरण व खंडाळा धरणही वाहिले. त्यामुळे ऐतिहासिक किल्लयातील नरमादी धबधबा गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात धो धो कोसळला. ते तब्बल महिनाभर पर्यटकांना हे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, गुलबर्गा, बिदर, आळंद, सांगली, सातारा यासह राज्याच्या कानाकोप-यातून बहुसंख्य पर्यटक आपल्या कुटुंबासह धबधबा पाहण्यासाठी नळदुर्ग किल्ल्यात एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर राज्यासह परप्रांतातील महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी तसेच विविध शाळांच्या सहली ही शहरात आल्याने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. गतवर्षी सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुमारे दोन लाखापेक्षा अधिक पर्यंटकानी नरमादी धबधब्याला भेट दिली होती. नरमादी धबधबा पाहण्याकरिता गेल्यावर्षी गणमान्य व्यक्तीसह उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सह कुटुंब येवून हे दृश्य डोळाने टिपले होते.
नळदुर्ग किल्ल्यातील १२० एकर क्षेत्रात वसलेल्या या किल्लयात देखरेखीसाठी अपुरे कर्मचारी आहेत. यावर्षी पावसाळ्यातील दोन महिने उलटून गेले मात्र पाऊसकाळ म्हणावा तसा झाला नाही. त्याचबरोबर नरमादी धबधबा चालू झाले नसल्याने पर्यटकांनी यंदाच्या वर्षी नळदुर्ग किल्ल्याकडे पाठ ङ्गिरविली आहे. त्याचा परिणाम येथील छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर होत आहे. तसेच अपुरे कर्मचारी असल्याने पर्यटकांना किल्ल्याची माहिती व इतर सुविधा मिळत नाही. किल्लयात प्रवेश करताना पुरातत्व विभागाकडून कोणताही कर वसुल केला जात नाही. येथे तिकीट लावले असते तर लाखो रूपये निधी पुरातत्व विभागास मिळाला असता, परंतू या विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे मोठे नुकसान होत आहे. तर नळदुर्ग नगरपरिषद पुरातत्व विभागाच्या हद्दीत येवून पार्कींग वसुलीचे ठेके देवून गतवर्षी पर्यंटकांची लूट करण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. गावातील काही मवाल्यांचे टोळके पर्यंटकांची छेड काढल्याचेही सर्वश्रूत आहे.


No comments:

Post a Comment